Sunday, 6 August 2017

प्रकरण दुसरे

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले

महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. १० 

सरकारी गोरे अधिकारी बहुतकरू ऐशारामात गुबग असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणाने एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असते. या दोन्ही कारणांमुळे शेतकरी लोक इतके लुटले जातात की, त्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही.

एकंदर सर्व हिंदुस्थानांत पूर्वी कांही परदेशस्थ व यवनी बादशाहा व कित्येक स्वदेशीय राजेरजवाडे या सर्वाजवळ शूद्र शेतकऱ्यांपैकी लक्षावधि सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदल, गोलंदाज माहूत, ऊंटवाले व अतिशूद्र शेतकऱ्यांपैकी मोतद्दार चाकरीस असल्यामुळे लक्षावधि शूद्रादी अतिशूद्रशेतकरी लोकांचे कुटुंबास शेतसारा देण्याची फारशी अडचण पडत नसे. कारण बहुतेक शेतकऱ्यांचे कुटुंबातील निदान एखाद्या मनुष्यास तरी लहानमोठी सरकारी असावायाचीच; परंतु हल्ली सदरचे बादशहा, राजेरजवाडे वगैरे लयास गेल्यामुळे सुमारे पंचवीस लक्षाचे वर शूद्रादी अतिशूद्र शेतकरी वगैरे लोक बेकार झाल्यामुळे त्या सर्वांचा बोजा शेतकी कारणांवर पडला आहे.

आमच्या जहामर्द इंग्रज सरकारच्या कारस्थानानें एकंदर सर्व हिंदुस्थानांत हमेशा लढायांचे धुमाळ्यांत मनुष्यप्राण्यांचा वध होण्याचे बंद पडल्यामुळे चहूंकडे शांतता झाली खरी, परंतु या देशांत स्वाऱ्या, शिकारी बंद पडल्यामुळे एकंदर सर्व लोकांचे शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजेरजवाडे “ भागू बाय” सारखे दिवसा सोवळे नेसून देवपूजा करण्याच्या नादांत गुंग होऊन रात्री निरर्थक उत्पति वाढविण्याचे छंदात लंपट झाल्यामुळे, येथील चघळ खानेसुमारी मात्र फार वाढली. यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले की, कित्येकांस आठआठ, दहा दहा पाभारीचे पेयावर गुजारा करावा लागतो, असा प्रसंग गुजरला आहे. व अशा आठआठ, दहादहा पाभरीचे पेऱ्याकरितां त्यांना एकदोन बैल जवळ बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेतें शेजाऱ्यापाजाऱ्यास अर्धेलीने अथवा खंडाने देऊन, आपली मुलेमाणसे बरोबर घेउन कोठेतरी मोलमजुरी करून पोट भरण्यास जातात.

पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेते असत व ज्याचा आपले शेतीवर निर्वाह होत नसे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यातील जंगलातून उंबर.जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस, मोहा ईत्यादी झाडांची फुले,पाने, आणि जंगलातून तोडून आणलेल्या लाकूडफाट्या विकून, पेट्टीपासोडीपुरता पैसा जमा करीत व गावचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गाया व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारागु करून मोठ्या आनंदाने आपआपल्या गावीच राहत असत; परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालूनभले मोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून, त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत डोंगर, टेकड्या, दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमिनी व गायरानें घालून फारेस्टखातें शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्यांचे शेरडाकरडास या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारासुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही. त्यांनी आता साळी,कोष्टी, सणगर,लोहार,सुतार वगैरे कसबी लोकांच्या कारखान्या त्यांचे हाताखाली किरकोळ कामे करूनआपली पोटे भरावी, तर इंग्लंडातील कारागीर लोकांनी रुचिरुचीच्या दारू-बाटल्या, पाव, बिस्कुटे,हलवे, लोणची,लहानमोठ्या सुया, दाभण, चाकू, कातऱ्या, शिवणाची यंत्रे,भाते, शेगड्या,रंगीबेरंगी बिलोरी सामान, सूत, दोरे,कापड,शाली, हातमोजे, पायमोजे, टोप्या,काठ्या छत्र्या,पितळ,तांबे,लोखंडी पत्रे , कुलुपे, किल्ल्या, डांबरी कोळस, तऱ्हेतऱ्हेच्या जागा गाडया, हारनिसे, खोगरे, लगाम, शेवटी पायपोस यंत्राद्वारे तेथे तयार करून, येथे आणून स्वस्त विकू लागल्यामुळे येथील एकंदर मालास मंदी पडल्याकारणाने येथील कोष्टी, साळी, जुलवी, मोमीन इतके कंगाल झाले आहेत की, त्यापैकी कित्येक विणकर लोक अतिशय मंदीचे दिवसांत उपाशी मरूं लागल्यामुळे अब्रुस्तव कधी कधीं चोरून छपून आपला निर्वाह डाळीच्या चुणीवर, कित्येक तांदळाच्या व गव्हाच्या कोंडयावर व कित्येक अंब्यांच्या कोयांवर करितात.

कित्येक पद्मसाळी, घरातील दातांशी दात लावून बसलेल्या बायकापोरांची स्थिती पहावेनाशी झाली म्हणजे, संध्याकाळी नि:संग होऊन दोनचार पैशांची उधार शिंदी पिऊन बेशुद्ध झाल्याबरोबर, घरात जाऊन मुडद्यासारखे पडतात. कित्येक पद्मसाळी गुजरमारवाडयाकडून मजुरीने वस्त्रे विणावयास आणलेले रेशीम व कलाबूत येईल त्या किमतीसविकून आपल्या मुलांबाळांचा गुजारा करून, गुजरमारवाड्यांच्या हाती तुरी देऊन रातोरात परगांवी पळून जातात. अशा पोटासाठी लागलेल्या बुभुक्षित कसबी लोकांनी रिकाम्या शेतकऱ्यांस मदत कशी व कोणती द्यावी?
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ११ 


दुसरें असे की, शूद्रादि अतिशूद्रांवर, पुरातनकाळी आपले वाडवडिलांनी महत्प्रयासांनी व कपटांनी मिळविलेले वर्चस्व चिरकाळ चालावे व त्यांनी केवळ घोडा, बैल वगैरे जनावरांसारखे बसून आपणांस सौख्य द्यावे, अथवा निर्जीव शेतें होऊन आपणासाठी जरूरीचे व ऐषआरामाचे पदार्थ त्यांनी उत्पन्न करावेत, या इराद्याने आटक नदीचे पलीकडेस हिंदु लोकांपैकी कोणी जाऊ नये, गेले असतां तो भ्रष्ट होतो अशी बाब ब्राह्मण लोकांनी हिंदू धर्मात घुसडली. यापासून ब्राह्मण लोकांच्या इष्ट हेतूसिद्धीस गेला; परंतु इतर लोकांचे फारच नुकसान झालें. परकीय लोकांच्या चालचलणुकीचा त्यास पडोसा न मिळाल्यामुळे ते खरोखरच आपणास मानवी प्राणी न समजता, केवळ जनावरे समजू लागले आहेत. इतर देशांतील लोकांशी व्यापारधंदा अगदी नकोसा झाल्याने ने कंगाल होऊन बसले; इतकेच नाहीं परंतु “आपले देशांत सुधारणा करा. आपले देशांत सुधारणा करा," अशी जी सुधारलेले ब्राह्मण लोक निदान ब्राहयात्कारी हल्ली हकाटी पिटीत आहेत, त्यास कारण त्यांची ही वर जाणविलेली धर्माची बाब कारण झाली असावी, हें अगदी निर्विवाद आहे. या कृत्रिमी बाबींमुळे साळी, सुतार वगैरे कारागिर लोकांचे तर अतिशय नुकसान झाले. आणि त्यास ती पुढे किती भयंकर स्थितीस पोहोचवील, याचा अदमास खऱ्या देशकल्याणेच्छुखेरीज कोणासही लागणार नाही.

आता कोणी अशी शंका घेतील की, गरीब शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांजवळ भरपूर शेतें असतील, त्याचे हाताखाली मोलमजुरी करून आपला निर्वाह करावा, तर एकंदर सर्व ठिकाणी संतती जास्त वाढल्यामुळे काही वर्षे पाळीपाळीने शेतें पडीक टाकण्यापुरती भरपूर शेतें शेतकऱ्यांजवळ उरली नाहीत. तेणेकरून शेतांस विसावा न मिळता तीं एकंदर सर्व नापीक झाली. त्यात पूर्वीप्रमाणे पिके देण्यापुरते सत्व शिल्लक राहिले नाही.त्यांना आपल्या कुटुंबाचा निर्वाह करिता करिता नाकी दम येतात, तेव्हा त्यांनी आपल्या गरीब शेतकरी बांधवास मोलमजुरी देऊन पोसावें, असें कसें होईल बरें? अशा चोहोंकडून अडचणीत पडलेल्या बहुतेक शेतकऱ्यांस आपली उघडी नागडी मुले शाळेत पाठविण्याची सवड होत नाही व हे सर्व आमच्या दूरदृष्टी सरकारी कामगारांस पक्केपणी माहीत असून ते सर्व अज्ञानी मुक्या शेतकऱ्यास विद्या देण्याच्या मिषाने सरकटीने लाखों रुपये लोकलफंड गोळा करितात व त्यांपैकी एक तृतीयांश रक्कम नांवाला विद्याखाती खर्ची घालून कोटें कोठे तुरळक तुरळक शाळा घातल्या आहेत. त्या शाळेत थोडीबहुत शेतकरी आपली मुलें पाठवितात. परंतु त्यांचे मुलांस शिकविणारे शिक्षक स्वतः शेतकरी नसल्याने त्यांस असावी तशी आस्था असते काय?

जे लोक आपल्या मतलबी धर्माच्या बडिवारामुळे शेतकऱ्यांस नीच मानून सर्वकाळ संध्या व सोवळेचाव करणारे, त्यांजपासून शेतकऱ्याचे मुलास यथाकाळी योग्य शिक्षण न मिळतां, ते जसेचे तसेच ठोंबे राहतात, यांतं नवल नाहीं; कारण आजपावेतो शेतकऱ्यांपासूनवसूल केलेल्या लोकलफंडाचे मानाने शेतकऱ्यांपैकी काही सरकारी कामगार झाले आहेत काय? व तसें घडून आले असल्यास ते कोणकोणत्या हुद्द्यांची कामे करीत आहेत, याविषयी आमचे वाकबगार शाळाखात्यांतील डिरेक्टरसाहेबांनीं नांवनिशीवार पत्रक तयार करून सरकारी ग्याझिटांत छापून प्रसिद्ध केल्यास, शेतकरी आपल्या मायबाप सरकारस मोठ्या उल्हासाने जेव्हा दुवा देतील, तेव्हा सरकारी ग्याझीटीयर मायाबापांचे डोळे उघडतील.

कारण खेड्यातून जेवढे म्हणून शिक्षक असतात, ते सर्व बहुतकरून ब्राह्मण जातीचेच असतात. त्यांचा पगार आठबारा रुपयांचे वरती नसतो व ज्यांची योग्यता पुण्यासारख्या शहरांत चारसहा रुपयांचे वरती नसतें, असले पोटार्थी अविद्वान ब्राह्मण शिक्षक, आपला मतलबी धर्म व कृत्रिमी जात्याभिमान मनांत दृढ धरून, शेतकऱ्यांचे मुलांस शाळेत शिकवितां शिकवितां उघड रितीने उपदेश करितात कीं, “तुम्हांला विद्या शिकून कारकुनांच्या जागा न मिळाल्यास आम्हासारखीं पंचांगें हातीं घेऊन घरोघर भिक्षा का मागावयाच्या आहेत?'
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


अशा अज्ञानी शेतकऱ्यांच्या शेतांची दर तीस वर्षांनी पैमाष करितांना, आमचे धर्मशील सरकारचे डोळे झाकून प्रार्थना करणारे युरोपीयन कामगार, शेतकऱ्यांचे बोडक्यावर थोडीतरी पट्टी वाढवल्याशिवाय शेवटी ‘आमेन’ची आरती म्हणून आपल्या कंबरा सोडीत नाहीत. परंतु सदाचे काम चालू असतां शिकारीचे शोकी युरोपीयन कामगार ऐषआराम व ख्यालीखुशालींत गुंग असल्यामुळे त्यांचे हातखालचे धूर्त ब्राह्मण कामगार अज्ञानी शेतकऱ्यास थोडे का नागवितात? व युरोपीयन कामगार त्यांजवर बारीक नजर ठेवितात काय?

पान क्र. १२ 

जेव्हा अज्ञांनी व मूढ शेतकऱ्यांत आपसांत शेताच्या बांधाबद्दल किंवा समाईक वाहिरीवर असलेल्या भाऊबंदीच्या पाणपाळीसंबंधी थोडीशी कुरबुर होऊन मारामारी झाली कीं, कळीचे नारद भटकुळकर्णी यांनी दोन्हीं पक्षांतील शेतकऱ्यांचे आळींनी जाऊन त्यांस निरनिराळे प्रकारचे उपदेश करून, दुसरे दिवशीं त्यापैकी एक पक्षास भर देऊन त्यांचे नांवाचा अर्ज तयार करून त्यास मामलेदाराकडे पाठवितात. पुढे प्रतिवादी व साक्षीदार हे, समन्स घेउन आलेल्या पट्टेवाल्यास बरोबर घेऊन आपआपली समन्से रुजू करण्याकरितां कुळकरण्यांचे वाड्यांत येतात व त्यांचीं समन्सें रुजूं करून शिपायास दरवाज्याबाहेर घालवितांच दोन्ही पक्षकारांस पृथक पृथक एके बाजूला नेऊन सांगावयाचे कीं, “तुम्ही अमक्या व तुम्ही तमक्या वेळी मला एकांती येऊन भेटा, म्हणजे त्याविषयी एखादी उत्तम तोड काढूं.”

नंतर नेमलेल्या वेळीं वादी व त्याचे पक्षकार घरी आल्यावर त्यास असे सांगावयाचे किं, “तुम्ही फार तर काय परंतु अमुक रकमेपर्यंत मन मोठे कराल, तर मामलेदारसाहेबांचे फडनविसास सांगून तुमचे प्रतिवादीस काहीना काही तरी सजा देववितों. कारण ते केवळ फडनविसाचे हातांत आहेत. मी बोलल्याप्रमाणे कांहींच घडून न आणल्यास, मी तुमची रक्कम त्याजपासून परत घेऊन तुम्हास देईल व माझे श्रमांबद्दल बहिरोबा तुम्हास जी बुद्धि देईल तेंच द्या किंवा काहींच दिलें नाहीं तरी चिंता नाही. माझी काहीं त्याविषयी तक्रार नाही. तुम्हाला यश आले म्हणजे आम्ही सर्व मिळवले.”

नंतर प्रतिवादीचे पक्षकाराकडून वादीचे दुपटीने व आपले श्रमाबद्दल कांही मिळून रक्कम घेऊन त्याजबरोबर असा करार करावयाचा कीं, “मी सांगतो तशी तकरार देऊन त्यावद्दल दोनतीन बनावट साक्षीदार द्या, म्हणजे फडनवीसास सांगून तुमच्या केसासही धक्का लागूं देणार नाही, कारण त्यांचे वजन मामलेदारसाहेबांवर कसें काय आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. व आता मी तुम्हाबरोबर करार केल्याप्रमाणे तुमचे काम फत्ते न झाल्यास त्याच दिवशी तुमची रक्कम त्यांजपासून परत आणून तुमची तुम्हास देईन; परंतु माझे श्रमाबद्दलचे घेतलेल्या रुपयांतून तुम्हांस एक कवडी परत करणार नाही, हे मी आतांच सांगतो, नाहीतर अशा खटपटींवाचून माझी काही चूल अडली नाही.”

नंतर मामलेदार काचेरींतील ब्राह्मणकामगार अक्षरशून्य अशू वादीप्रतिवादीच्या व त्यांच्या साक्षीदारांच्या ज़बान्या घेतेवेळी, ज्या पक्षकारांकडून त्यांची मूट गार झाली असेल, त्यांच्या जबान्या घेतेवेळी त्यांस कांही सूचक प्रश्न घालून अनुकूल जबान्या तयार करितात.

परंतु ज्या पक्षकारांकडून त्यांचा हात नीट ओला झाला नसेल, त्यांच्या जबान्या लिंहितेवेळी त्यामध्ये एकंदर सर्व मुद्दे मागेपुढे करून अशा तयार करितात की, यांजपासून वाचणाराच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या मनांत त्या कज्यांचे वास्तविक स्वरुप न येतां, त्यांचा समज त्यांविरुद्ध होईल. कित्येक ब्राह्मण कारकून अज्ञान शेतकऱ्यांच्या जबान्या लिहितांना त्यातील काही कलमांची मुद्दे अजिबात गाळून टाकितात.

कित्येक ब्राह्मणकामगार शेतकऱ्यांच्या जबान्या आपल्या घरी नेऊन रात्री दुसऱ्या जबान्या तयार करून सरकारी दप्तरांत आणून ठेवितात. असे असेल तर एखादा निःपक्षपाती जरी अम्मलदार असला, तरी त्याच्या हातूनही अन्याय होण्याचा संभव आहे. यापुढे खिसे चापसणाऱ्या बगलेवकिलांनी भरीस घातल्यावरून त्यांनी युरोपियन कलेक्टराकडे अपीले केल्यावर कलेक्टरांच्या शिरस्तेदारांच्या, ज्या पक्षकारांकडून मुठी गार होतील, त्याप्रमाणे त्यांच्या अर्जीच्या जबानीच्या सुनावण्या कलेक्टरपुढे करितात व त्या वेळीं यांतील बहुतेक मारू मुद्दे वाचता वाचता गाळन कलेक्टराचे मुखातून शुद्ध सोनेरी वाक्यें,”टूमची टकरार टरकटी आहे” बाहेर पडून आपले वतीनें निकाल करून घेण्याचे संधान न साधल्यास, शिरेस्तेदार त्यांचे प्रकाणावर आपले मर्जी प्रमाणे गिचमिड मराठी लिहून साहेबबहादूर संध्याकाळी आपल्या मॅडम साहेबाबरोबर हवा खाण्यास जाण्याचे धांदलीत, अगर मराठी नीट समजणारा एखादा दंडुक्या साहेब असल्यास तो आदले दिवशीं कोठे मेजवानीस जाऊन जागलेला असल्यामुळे दुसरे दिवशी सुस्त व झोपेच्या गुंगीत असता, किंवा शिकारीस जाण्याचे गडबडीत तेथे जाऊन, पूर्वी त्यांनी जसे शेरे सांगितले असतील, त्याप्रमाणे हुबेहूब वाचून दाखवून त्याच्या सह्या त्या प्रकरणावर सहज घेतात.

कित्येक तिरसट कलेक्टरांचे पुढे धूर्त शिरस्तेदारची मात्रा चालत नसल्यास ते कांही आडमूठ अक्षरशून्य शेतकऱ्यांची प्रकरणे मुख्य सदर स्टेशनच्या ठिकाणी तयार न करिता त्यास गांवोगांव कलेक्टराचे स्वारीमागे पायाला पाने बांधून शिळे तुकडे खात खात फिरावयास लावून त्याची हाडे खीळखिळी करून मस्ती जिरवितात. व कित्येक निवळ अज्ञानी शेतकऱ्यांच्या अर्ज्या फैलास एकदोन दिवस न लावता, त्यांच्या प्रतिपक्षाकडून कांही चिरीमिरी मिळाल्यास त्या मुळीच गाळून टाकितात. अखेरीस दोन्ही पक्षांपैकी जास्ती पैसा खर्च करणाच्या पक्षास जेव्हा जय मिळतो, तेव्हा एकंदर सर्व गांवकरी लोकांत चुरस उत्पन्न होऊन गावांत दोन तट पडतात. नंतर पोळयाचे दिवशी बैलाची उजवी बाजू व होळीस अर्धी पोळी कोणी द्यावी, यासंबंधी दोन्ही तटांमध्ये मोठमोठ्या हाणामाऱ्या होऊन त्यांतून कित्येकांची डोकी फुटून जखमा जाल्यावर भट ( एकंदर सर्व फौजदारी, दिवाणी वगैरे कज्जे अज्ञानी शेतकऱ्यांना उपस्थित करण्याचे कामी कज्जाचे तळाशी हे कळीचे नारद नाहीत असे फारच थोडे कज्जे सांपडतील) कुळकर्णी दोन्ही तटवाल्यांस वरकांति शाबासक्या देऊन, आंतून पोंचट पोलीसपाटलास हांतात घेऊनतालुक्यातील मुख्य पोलीस भुतावळास जागृत करितात.

तेव्हा तेथून, आंतूनकाच्यांनी पोटे आवळून वरून काळ्या पिवळया पाटलोनी व बूट, डगल्यापगड्यांनी सुशोभित होऊन, हाती रंगीबेरंगी टिकोरी घेतलेल्या बुभुक्षित शिपायांच्या पाठीमागे धापा देत एकदोन झिंगलेले हवालदार व जमादार बगलेत बोथलेल्या तरवारी घेऊन प्रथम गांवात येताच महार व पोलीसपाटील यांस मदत घेऊन व एकंदर गावांतील दोन्ही पक्षांतील लोकांस पकडून आणून चावडीवर कैद करितात व पहारेकऱ्याशिवाय बाकी सर्व शिपाई व अम्मलदार अज्ञानी पाटीलसाहेबांचे मदतीने, मारवाड्याच्या दुकानातून मन मानेल त्या भावाने व मापाने सिधासामुग्री घेऊन चावडीवर परत येता येता, दारूच्या पीठ्यांत कोणी मेजवान्या दिल्यास, ऐन गुंगीच्या नादांत जेवून गार झाल्यानंतर, थोडीशी डामडौली पूसतास करून त्यांच्या त्या सर्व कैदी लोकांस मुख्य ठाण्यांत आणून फौजादारासमोर उभे करून त्याच्या हुकुमाप्रमाणे त्याची पक्की चौकशी होईतोपावेतो त्यास कच्चे कैदेत ठेवितात.

यापुढे कैदी शेतकऱ्यांच्या घरची माणसे आपापल्या मुलाबाळांच्या अंगावरील किडूकमिडूक मोडून आणलेल्या रकमा फौजदारकचेरींतील कामगारांची समजूतकरण्याचे भरीस कसकशा घालवितात, त्यापैकी कांही मासले येथे दाखवितो. जर एखाद्या पक्षांतील लोकांस जास्ती मोठाल्या जखमा झाल्या असल्यास धूर्त कामगार , कुळकर्ण्याचेद्वारे दुसऱ्या पक्षाकडून काही रकमा घेवून त्यांच्या त्या सर्व जखमा बऱ्या होऊन त्यांचा मागमुद्दा मोडेतोंपावेतो ति प्रकरणे तयार करून मजीस्ट्रेटसाहेबाकडे पाठविण्यास विलंब लावतात. कधी कधीं धूर्त कामगारांच्या मुठी गार झाल्यास ते दुस-या पक्षांतील मुद्याचे साक्षीदारांनी त्यांच्या खटल्यांत साक्षीच देऊं नये म्हणून त्यांच्या सावकारास भिडा घालितात. ते कधीं कधी मुद्याचे साक्षीदारांनीआपली सामने रुजू करण्याचे पूर्वी त्यास कुळकर्ण्याचेमार्फत नानातर्हेच्या धाकधमक्या देऊन त्यास भलत्या एखाद्या दूर परगावी पळवून लावितात.

त्यातून काही आढमूठ अज्ञानी शेतकऱ्यांनी कुळकर्ण्याचेद्वारे ब्राह्मणकामगारांच्या सूचनांचा अव्हेर करून आपल्या आपल्या साक्षी देण्याकरितां कचेरीत आल्यास, एक तर ते अक्षरशून्य असल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्त्या धड नसतात व दुसरें त्यांस मागच्यापुढच्या सावालांचा संदर्भ जुळून जबान्या देण्याची स्फूर्ति नसते, यामुळे त्यांच्या जबान्या घेतेवेळी धूर्त कामगार त्यांसइतके घाबरे करितात किं, त्यास “दे माय धरणी ठाव ” होतो. ते कधी कधी अज्ञानी शेतकऱ्यांच्या जबान्या घेतांना त्यांच्या नानाप्रकारच्या चाळकचेष्टा करून त्यांस इतके घाबरे करितात की, त्यांनी खरोखर जे कांही डोळ्यांनी पाहिले व कानांनी ऐकलें असेल, त्याविषयी इत्यंभूत साक्ष देण्याची त्यांची छातीच होत नाही. याशिवाय कित्येक धाडस कामगारांचे हातावर भक्कम दक्षिणा पडल्या कीं, ते कुळकण्यांचे साह्यानें कायद्याचे धोरणाप्रमाणे नाना प्रकारचे बनाऊ पुरावे व साक्षिदार तयार करवून मन मानेल त्या त्या अज्ञानी शेतकऱ्यास दंड अथवा ठेपा करवितात.

त्या वेळी त्या सर्वाजवळ दंड भरण्यापुरता रकमा नसल्यामुळे, त्यांपैकी बहुतेक शेतकरी, आपले इष्टमित्र, सोयारेधायाऱ्यांपासून उसन्या रकमा घेऊन दंडाच्या भरीस चालून घरोघर आल्याबरोबर, उसन्या रकमा घेतलेल्या ज्यांच्या त्यांसपरत देऊन इतर ठेपा झालेल्या मंडळीस तुरुंगातून सोडविण्याकरिता अपिले लावण्यापुरत्या रकमा सावकारापाशीं कर्ज मागू लागल्यास आमच्या सरकारच्या पक्षपाती शेतकऱ्यांचे कायद्यामुळे शेतकऱ्यास कोणी अब्रुवाले सावकार आपल्या दाराशी उभेसुद्धा करीत नाहीत. कारण आपले पदरचे पैसे शेतकऱ्यास कर्जाऊ देऊन, त्यानंतर निवाडे करून घेतेवेळी खिसे चापासणाऱ्या आढमुठ शुद्र बेलिफांच्या समजुती काढून सामने रुजू करून आणलेल्या अज्ञानी शेतकऱ्यांसमक्ष भर कोडतात सावकारास फजिती करून घ्यावी लागते.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. १३ 

कित्येक तरुण गृहस्थांनी नानाप्रकारची कायदेपुस्तके राघुसारखी तोंडपाठ केल्यामुळे त्यांच्या त्यांच्या परीक्षा उतरतांच आमचे भोळसर सरकार त्यांस मोठमोठ्या टोलेजंग न्यायधिशांच्या जागा देते, परंतु हे लोक आपल्या सार्वजनीक मूळ महत्त्वाचा बांधवी संबंध तोडून, आपण येथील भूदेवाचे औरस वारसपुत्र बनून, कोडतात एकंदर सर्व परजातीतील वयोवृद्ध, वडील दुबळया गृहस्थास तुच्छ मानून त्यांची हेळसांड करितात. प्रथम हे सरकारी रिवाजाप्रमाणे एकंदर सर्व साक्षीदार वगैरे लोकांस कोडतात दहा वाजता हजर होण्यास सामानें करून आपण सुमारें बारा वाजता कोडतात येऊन, तेथील एखादे खोलीत तास अर्धातास उताणे पालथे पडून नानात्र डोळे पुशीत बाहेर चौरंगावरील खुर्चीच्या आसनावर येऊन बसल्याबरोबर, खिशातील पानपट्टी तोंडात घालून माकडाचे परी दांत विचकून चावतां चावतां पायावर पाय ठेवून, पाकेटातील डब्या बाहेर काढून तपकिरीचे फस्के नाकांत ठासता ठासतां खालीं बसलेल्या मंडळीवर थोडीशी वांकडी नजर टाकून डोळे झांकीत आहेत, इतक्यात तांबडी पगडी, काळी डगली, पाटलोणबुटांनी चष्क बनून आलेल्या वकिलांनी त्यांच्यापुढे उभे राहून मिशांवर ताव देऊन “युवर आनर' म्हणण्याची चोपदारी ललकरी ठोकल्यावर हे भूदेव जज्जसाहेब आपल्या पोटावर हात फिरवूनआपले जातभाऊ वकिलास विचारतात की,”तुमचे काय बोलणे आहे?” यावरून वकीलसाहेब आपल्या खिशांत हात घालून म्हणतात कीं, “आज एका खुनी खटल्याच्या संबंधानें आम्हांस सेशनांत हाजर होणे आहे.

सबब आपण मेहेरबान होऊन आमचे मार्फतचे येथील कज्जे आज तहकूब ठेवावेत.' हें म्हणताच न्यायाधिशांनी माना हलवून गुढ्या दिल्याबरोबर वकीलसाहेब गाडयाघोडद्यावर स्वार होऊन आपला रस्ता धरितांच न्यायाधीश आपल्या कामाची सुरवात करितात. याविषयी येथे थोडेसे नमुन्याकरितां घेतों. कित्येक भूदेव न्यायाधिश आपल्या ऊच जातीच्या तोऱ्यांत किंवा कालच्या ताज्या अमलाच्या झोकात न्याय करितांन, बाकी सर्व जातींतील बहुतेकलोकांबरोबर अरेतुरेशिवाय भाषणच करीत नाहीत. कित्येक अक्कडबाज गृहस्थांनी कोडतांत आल्याबरोबर या राजबिंड्या भूदेवास लवून मुजरे केले नाहीत, तर त्यांच्या जबान्या घेतेवेळी त्यांस निरर्थक छळितात. तशांत ब्राह्मणी धर्माच्या विरूद्ध एखाद्या ठिकाणीं समाज उपस्थित होऊन त्यास सामील असणाऱ्यांपैकी थोर गृहस्थास कोडतात हजर होण्यास थोडासा अवेळ झाला किं, त्यांचा सूड (येथे सुधारणा करणाच्या लोकांनी सरकारच्या नांवाने कां शिमगा करावा?) उगविण्याकरिता त्यांच्या श्रीमंतीची अथवा त्यांच्या वयोवृद्धापणाची काडीमात्र परवा न करिता, त्यांची भर कोडतात जबान्या घेतेवेळी रेवडी रेवडी करून सोडीतात.

त्यांतून हे भूदेव बौद्धधर्मी मारवाड्यांची फटफजिती व पट्टाधूळ कसकशी उडवितात, हें जगजाहिर आहेच. कधी कधी ह्या छद्मी भूदेवाच्याडोक्यांत वाडीप्रतिवादींच्या बोलण्याचा भावार्थ बरोबर शिरेनासा झाला, म्हणजे हे स्नानसंध्याशील, श्वानासारखे चवताळून त्याच्या हृदयाला कठोर शब्दांनी चावे घेतात.ते असे किं – “तू बेवकूफ आहेस, तुला वीस फटके मारून एक मोजावा. टू लालतोंड्याचा भाऊ तीनशेंड्या मोठा लुच्चा आहेस.” त्यावर त्यांनी कांहीं हूं चूं केल्यास त्या गरिबाचे दावे रद्द करितात.

इतकेंच नव्हे परंतु या खुनशी न्यायाधिशांच्या तबेती गेल्या कीं, सर्व त्यांच्या जबान्या घरीं नेऊन त्यांतील कांहीं मुद्यांची कलमें गाळून त्याऐवजीं दुस- या ताज्या जबान्या तयार करवून, त्यावर मन मानेल तसे निवाडे देत नसतील काय? कारण हल्ली कोणत्याही जबान्यांवर, जबान्या लिहून देणाऱ्यांच्या सहया अथवा निशाण्या करून घेण्याची वहिवाट अजी काढून टाकली आहे. सारांश, बहुतेक भूदेवन्यायाधीश मन मानेल तसे घाशीराम कोतवालासारखे निवाडे करूं लागल्यामुळे कित्येक खानदान चालीच्या सभ्य सावकारांनी आपला देवघेवीचा व्यापार बंद केला आहे. तथापि बहुतेक ब्राह्मण व मारवाडी सावकार सदरचे अपमानाचा विधिनिषेध मनांत न आणिता कित्येक अक्षरशून्य शेतकऱ्यांबरोबर देवघेवी करितात.

त्या अशा कीं, प्रथम ते, अडचणींत पडलेल्या शेतकऱ्यांस फुटकी कवडी न देतां, त्याजपासून लिहून घेतलेल्या कर्जरोख्यांवरून त्याजवर सरकारी खात्यांतून हद्दपार झालेल्या खंगार पेनशनर्स लोकांनी सुशोभित केलेल्या लवादकोर्टात हुकुमनामे करून घेऊन नंतर व्याजमनुती कापून सावकार नापतीच्या अक्षरशून्य शेतकऱ्यास सांगतात कीं, “सरकारी कायद्यामुळे तुम्हांला गहाणावर कर्जाऊ रुपये आम्हांस देता येत नाहीत, यास्तव तुम्ही जर आपलीं शेतें आम्हास खरेदी करून द्याल, तर आम्ही तुम्हास कर्ज देऊं व तुम्ही आमचे रुपयांची फेड केल्याबरोबर आम्ही तुमची शेतें परत खरेदी करून तुमच्या ताब्यात देऊं,” म्हणून शपथ घेऊन बोल्या मात्रा करितात, परंतु या सोंवळया व अहिंसक सावकरापासून कुटुंबवत्सल अज्ञानी भोळया शेतकऱ्यांची शेते क्वचितच परत मिळतात.

याशिवाय हे अट्टल धर्मशील सावकार, अक्षरशून्य शेतकऱ्यांस कर्ज देतांना त्यांचे दुसरे नाना प्रकारचे नुकसान करितात. सदरील सावकार अक्षरशून्य शेतकऱ्यांवर नानात?हेच्या बनावट जमाखर्चाच्या वहयांसहित रोख्यांचे पुरावे देऊन फिर्यादी जेव्हा ब्राह्मण मुनसफांच्या कोर्टांत आणितात, तेव्हा अज्ञानी आपणास खरे न्याय मिळावेत म्हणून आपले डागडागिने मोडून, पाहिजे तितक्या रकमा कज्जाच्या भरीस घालतात: परंतु त्यांस त्यांचे जातीचे विद्वान वशिले व खरी मसलत देणारे सूज्ञ गृहस्थ वकील नसल्यामुळे अखेर त्यावरच उलटे हुकुमनामे होतात, तेव्हां ते विचारशून्य, चार पोटबाबू बगलूंवकिलांचे फुसलावण्यावरून आपल्या बरोबर न्याय मिळतील या आशेने वरिष्ठ कोडतांत अपिले करितात; परंतु वरिष्ठ कोडतांतील बहुतेक युरोपियन कामगार ऐषआरामांत गुंग असल्यामुळे अज्ञानी शेतकऱ्यांस एकंदर सर्व सरकारी खात्यांतील ब्राह्मणकामगार किती नाडितात,

याविषयीं येथे थोडेसे मासलेवाईक नमुने घेतों, ते येणेंप्रमाणे :- प्रथम धूर्त वकील अज्ञानी शेतकऱ्यापासून स्टांपकागदावर वकीलपत्रे व बक्षीसादाखल कर्जाऊ रोखे लिहून घेतांच त्यांजपासून सरकार व मूळ फिर्यादीकरिता स्टांप वगैरे किरकोळ खर्चाकरिता अगाऊरोख पैसे घेतात. नंतर कित्येक धूर्त वकी, शिरास्तेदारांचे पाळीव रांडांच्या घरी शिरस्तेदारसाहेबांचे समोर त्यांची गाणी करवून त्यांस शेतकऱ्यांपासून रकमा देववितात. अज्ञानी शेतकऱ्यांपासून आडवून लांच खाणाऱ्या सरकारी कामगारास व लाचार झाल्यामुळे लांच देणाया अक्षरशून्य शेतकऱ्यांस कायदेशीर शिक्षा मिळते.

हत्यारबंद पोलिसांच्या उरावर दरवडे घालणाऱ्या भट फडक्या रामोशास व लाचार झाल्यामुळे फडक्याबरोबर त्याच्या पातीदार भावास शिळेपाके भाकरीचे तुकडे देणाऱ्या भित्र्या शस्त्रहीन कंगाल शेतकऱ्यांचे बोडक्यावर जशी कायदेशीर पोलीसखर्चाची रक्कम लादली जाते, व शेतकऱ्यांचे घरांत चोऱ्या करणाच्या सर्व जातीच्या चोरट्यांस जशी कायदेशीर शिक्षा मिळते,त्याचप्रमाणे जे शेतकरी आपल्या पहिल्या झोपेच्या भरांत असता त्यांच्या घरात चोरांनी चोऱ्या केल्या असतां त्या शेतकऱ्यांसही कायदेशीर शिक्षां का नसावी?! एवढा कायदा मात्र आमचे कायदेकौन्सिलांनीकरून एकंदर सर्व पोंचट पोलिसांचा गळा मोकळा केल्याबरोबर आमचे न्यायशील सरकारचे स्वर्गाजवळच्या सिमल्यास घंटानाद होईल.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. १४ 

कित्येक कर्मिष्ठ ब्राह्मणकामगार आपल्या जातीतील पुराणिकाला व कथेकऱ्याला, कित्येक अज्ञानी सधन शेतकऱ्यांपासून देणग्या देववितात. कित्येक धोरणी धूर्त, अज्ञानी भोळया सधन शेतकऱ्यांस गांठून त्यांजपासून राधाकृष्णाची नवी देवळे गांवोगावी बांधवून, काही जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करवितात व त्यांजकडून उद्यापनाचे निमित्ताने ब्राह्मणभोजने काढितात. कित्येक धूर्त कामगार युरोपियन कामगारांच्या नजरा चुकवून एकंदर सर्व अज्ञानी शेतकऱ्यांस नानाप्रकारे त्रास देतात व त्याबद्दल शेतकरी लोक आंतले आंत त्यांचे नांवानें खडे फोडीत असतांही त्यांनी (कामगारांनी) युरोपियन कामगारांचे पुढे पुढे रात्रंदिवस चोंबडक्याकेल्या किं, ते त्यांचेबद्दल उलट्या सरकारांत शिफारशी करून त्यांच्या बढत्या करवितात.

त्यांतून बहुतेक युरोपियन कामगारांस दहावीस मिनिटे अस्खलित मराठी भाषण करण्याची केवढी मारामार पडते आणि अशा “टूमी आमी” करणाऱ्या युरोपियन कामगारास सातारकर छत्रपती महाराज, हिम्मतबहादर, सरलष्कर, निंबाळकर, घाटगे, मोहिते, दाभाडे, घोरपडे वगैरे शेतकरी१ जहामर्दांची खासगत सोजरी भाषणांतील सर्व गाऱ्हाणी शिस्तवार समजून घेउन त्यांचे परिहार ते कसें करीत असतील, ते देव जाणे! कित्येक धूर्त ब्राह्मणकामगार आपल्या धोरणाने सदा सर्वकाळ वागूं लागतील, वा इराद्यानें ते जिल्हयांतील कित्येक कुटाळ असून वाचाळ भटब्राहमणांस पुढे करून त्यांचे हातून जागोजागमोठाले जंगी समाज उपस्थित करवितात व आंतून आपण अन्य रीतीनें शूद्रांतील शेतकरी, गवतवाले, लाकडवाले, कंट्रयाक्टर, पेनशनर्स व इस्टेटवाले गृहस्थांकडे आपलें वजन ते भिडा खर्ची घालून त्यास पाहिजेल त्या समाजात सभासद करवितात.

कित्येक युरोपियन कामगारांच्या कांहीं घरगुती नाजूक कामास मदत देण्याचे उपयोगी ब्राह्मण शिरस्तेदार पडले किं, युरोपियन कामगार त्यांच्याविषयीं सरकारांत शिफारशी करून त्यांस रावसाहेबांच्या पदव्या देववितात आणि सदरचे युरोपियन कामगारांच्या जेव्हा दुसऱ्या जिल्हयात बदल्या होतात, तेव्हा ते तोंडपुजे रावसाहेब मनास येतील तशीं मानपत्रे तयार करून, त्यांवर शहरांतील चारं पोकळ प्रतिष्ठा मिरविणाऱ्या अज्ञानी, सधन कुणब्या माळ्याच्या व तेल्यातांबोळ्यांच्या मोडक्यातोडक्या सहया भरतीला घेऊन भलत्या एखाद्या अक्षरशून्य शूद्र कंट्रयाक्टरांच्या टोलेजंग दिवाणखाऱ्यांत मोठमोठ्या सभा करून त्यांमध्ये त्यांस हीं मानपत्रे देतात.

सारांश अस्मानी सुलातानीमुळे पडलेल्या दुष्काळापासू; तसेंच टोळ्यांच्या तडाक्यापासून होणारे नुकसान केव्हांतरी भरून येते, परंतुसर्व एकंदर सर्व लहानमोठ्या सरकारी खात्यांत बहुतेक युरोपिअन कामगार ऐषआरामांत गुंग असल्यामुळे, त्या सर्व खात्यांत भट पडून, ते कोंकणांतील ब्राह्मण खोतासारखे येथील सर्व अक्षरशून्य शेतकऱ्यांचे जें नुकसान करितात, तें कधीही भरून येण्याची आशा नसते. या सर्वाविषयीं कच्च्या हकीकती लिहूं गेल्यास त्यांची “मिस्तरीज ऑफ दि लंडन” सारखी पुस्तके होतील व ही अज्ञानी शेतकऱ्यांची झालेली दैन्यवाणी स्थिती जेव्हा ख्रिस्त लोकांस पहावेना, तेव्हां त्यांनीग्रेट ब्रिटनात येथील विद्याल्खात्याचे नावाने शिमग्याचा संस्कार सुरु केला. त्यावरून येथील कांहीं सभ्यराद्ग्रहस्थांसहित कित्येक बडे सरदार लोकांनी हिंदुस्थानांतील विद्याखात्याकडील मुख्य अधिकाऱ्यांची थोडीशी पट्टाधूळ झाडण्याची सुरुवात केली, कोठे न केली, तोंच मायाळू गव्हरनर जनरलसाहेबांनी येथील विद्याखात्याविषयीं पक्की चौकशी करण्याकरिता, चार-पाच थोर विद्वान गृहस्थांची कमिटी स्थापून त्यामध्ये मे. हंटरसाहेब मुख्य सभानायक स्थापतांच त्यांनी आपल्या साथीदारांस बरोबर घेऊन “निमरॉड” शिकाऱ्यासारखे तिन्ही प्रेसिडेन्सीत आगगाड्यांतून मोठी पायपिंटी केली, परंतु त्यांनी येथील एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्र शेतकरी अक्षरशत्रु असल्यामुळे ते कोणकोणत्या प्रकारच्या विपत्तीत संकटे भोगीत आहेत, याविषयी बारीक शोध काढण्याविषयी शेतकऱ्यांचे घाणेरड्या झोपडयात स्वतः जावून तेथे आपल्या नाकाला थोडासा पदर लावून तेथील त्यांचे वास्तविक दैन्य चांगले डोळे पसरून पाहून तेथील भलत्या एखाद्या अक्षरशून्य, लंगोट्या शेतकऱ्याची साक्षी न घेतां हिंदु, पारशी, ख्रिस्ति धर्मातील बहुतेक सुवाष्ण ब्राह्मणांच्या साक्षी घेण्यामध्ये रंग उडविण्याची बहार करून जागोजागची मानपत्रे बगलेत मारून अखेरीसआपली पायधूळ कलकत्त्याकडे झाडली आहे खरी, परंतु त्यांच्या रिपोर्टापासून अज्ञानी शेतकऱ्यांचा योग्य फायदा होईल, असे आम्हाला अनुमान करितां येत नाही.



तात्पर्य मे. हंटरसाहेब यांनी, आमचे महाप्रतापी गव्हरनर जनरल साहेबमहाराजांस निरापेक्ष मे. टक्कर (साल्वेशन आर्मीचे) साहेबासारख्या धूर्त लोकांशीं टक्कर मारण्याकरितां आपल्या कामाचा राजीनामा देऊन स्वतः दीन-दुबळ्या अज्ञानी शेतकऱ्यांचे आळोआळीने खटाऱ्यात बसून त्यांस अज्ञानांध:कारांतून मुक्त करण्याचे खटाटोपीचा प्रसंग आणला नाही. म्हणजे त्यांच्या (हंटरसाहेबांच्या) नौबतीचा डंका वाजेल; व त्याचा आवाज पाताळच्या प्रजासत्ताक राज्याच्या प्रतिनिधींच्या कानीपडताच त्यांचे डोळे उघडून त्यांच्या अंत:करणात आमचे दीनबंधू काळे लोक ”रेड इंडियन्स” यांजविषयी दया उद्भवेल.

या प्रकरणांत एकंदर सरकारी ब्राह्मण नोकरांविषयी लिहिलेल्या मजकुराबद्दल पुरावा पाहिजे असल्यास ठिकठिकाणीं आजपर्यंत लांच खाल्याबद्दल किंवा खोट्या लिहिण्याबद्दल वगैरे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवरून शिक्षा झालेल्या व त्याविषयीं फिर्यादी झालेल्या आहेत, त्या पहाव्या म्हणजे सहज सांपडेल.
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.