Sunday, 6 August 2017

प्रकरण पहिले

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले


पान क्र. १ 

सरकारी सर्व खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषानें अज्ञानी शेतकऱ्यांस इतके नाडितात कीं त्यांस आपली लहान चिटकुलीं मुलें शाळेत पाठविण्याची साधनें रहात नाहीत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दुरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं.

आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्ममिषानें इतकें नाडितात कीं, त्यांजविषयों या जगांत दुसरा कोठें या मासल्याचा पडोसा सांपडणे फार कठीण. पूर्वीच्या धूर्त आर्यब्राह्मण ग्रंथकारांनी आपले धर्माचे लिगाड शेतकऱ्यांचे मागे इतके सफाईनें लावले आहे की, शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतु प्राप्त होतो, तेव्हा तिच्या गर्भाधानादि संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो, इतकेंच नव्हे तर हा मेला, तरी याच्या मुलास श्राद्धें वगैरेच्या मिषानें धर्माचें ओझे सोसावे लागतें. कारण शेतकऱ्यांचे स्त्रियांसऋतु प्राप्त होताच भटब्राह्मण जपानुष्ठान व तत्संबंधीं ब्राह्मणभोजनाचे निमित्तानें त्यांजपासून द्रव्य हरण करितात व सदरचीं, ब्राह्मणभोजनें घेतेवेळीं भटब्राह्मण आपले आप्तसोयरे व इष्टमित्रांसह तूपपोळ्यांची व दक्षिणेची इतकी धांदल उडवितात, कीं त्यांच्या उरल्यासुरल्या अन्नापैकीं त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यांस पोटभर आमटीपोळी मिळण्याचीसुद्धा मारामार पडते. ऋतुशांतीनिमित्ताने भटब्राह्मणांची उदरशांती होऊन त्यांचे हातावर दक्षिणा पडतांच ते शेतकऱ्यास आशिर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्रियांनी शनिवार अथवा चतुर्थीचीं व्रतें धरावी म्हणोन उपदेश करून घरोघर चालते होतात.

पुढे भटब्राह्मण दर शनिवारी व चतुर्थीस शेतकऱ्यांचे स्त्रियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीचे गळ्यांत घालवून व गवताच्या जुड्या गणपतीचे माथ्यावर रचून शिधेदक्षिणा आपण घेतात व पुढें कधीं कधीं संधान साधल्यास सदरची व्रतें उजविण्याची थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहानमोठी ब्राह्मणभोजनें घेतात. इतक्यांत शेतकरणी बाया सृष्टीक्रमाप्रमाणे गरोदर झाल्यास, भटब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंज्यांचे ब्राह्मण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकऱ्यांशीं सहज बोलतां बोलतां बाहेर काढावयाचे व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसूत होण्याच्या पूर्वी भटजीबुवा शेतकऱ्यांचे घरी रात्रंदिवस खड्या (फेऱ्या) घालितात व त्यांच्याशीं मोठी लाडीगोडी लावून त्यांच्याशीं यजमानपणाचीं नातीं लाऊन त्यांजपासून त्या नवसांची फेड करून घेतात.

पुढे शेतकऱ्यांचे स्त्रियांस पुत्र झाले कीं, भटब्राह्मणांची धनरेषा उपटते. ती अशीं कीं, प्रथम मुख्य उपाध्ये शेतकऱ्यांचे घरी जातात व त्यांचे घरांतील वाव व कासऱ्यांनीं वेळ मोजणान्या अज्ञानी स्त्रियांस मुलांचे जन्मकाळ विचारून, ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील, तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीनें तयार करितात कीं अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्रजन्माने जहालेल्या सर्व आनंदांत माती कालवून, त्यास घाबरे करितात व दुसरे दिवशी त्याजकडून पिंडीतील लिंगापुढे आपले भाऊबंद, सोयरे-धायरे व इष्टमित्रांपैकीं भटब्राह्मणास मोलानें जपानुष्ठानास बसवितात व त्यांपैकी कोणांस शेतकऱ्यापासून उपोषणाचे निमित्ताने फलाहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात, पावसाळा असल्यास छत्र्या आणि हिवाळा असल्यास पांढऱ्या धाबळ्या देववितात , खेरिज उपाध्याचा हात चालल्यास, तो शेतकऱ्यापासून पुजेच्या निमित्तानें तेल, तांदूळ, नारळ, खारका, सुपाऱ्या, तूप, साखर, फळफळावळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाहीत. शेतकऱ्यांचे मनावर मूर्तिपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काहीं भट तपानुष्ठान संपेपावेतों आपल्या दाढयाडोया वाढवितात, कांहीं फलाहारावर राहतात.

अशा नाना प्रकारच्या लोणकढ्या थापा देवून जपानुष्ठान संपेपावेतो भटब्राह्मण, शेतकऱ्याचे बरेंच द्रव्य उपटतात.शेवटी समाप्ति करवितेवेळी भटब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यापासून ब्राह्मणभोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयीं कसकशी चंगळ उडवितात हें सर्व आपणांस माहीत असेलच.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. २ 

आर्य भटब्राह्मण आपल्या संस्कृत विद्यालयांत शूद्र१ शेतकऱ्यांचे मुलास घेत नाहीत परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळांत कामापुरती शूद्र शेतकऱ्यांची मुलें घेतात व त्यांजपासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या, कित्येक सणांस शिधा, दक्षिणा व मुलांनी शाळेत खाण्याकरितां आणिलेल्या चबिन्यामधून चौथाई घेऊन त्यांस धुळाक्षर, अंकगणित, मोडी कागदवाचन, भाकडपुराणसंबंधीं प्राकृत श्लोक व भूपाळया शिकवून त्यांस कलगी अथवा तुऱ्याच्या पक्षाच्या लावण्या शिकून तत्संबंधीं झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडितात. त्यांस आपल्या घरची हिशेबाची टांचणे ठेवण्यापुरतेंदेखिल ज्ञान देत नाहींत. मग त्यांचा मामलेदार कचेऱ्यांत प्रवेश होऊन, कारकुनीचें काम करणें कठीणच.

शेतकऱ्यांचे मुलाच्या मागणीच्या वेळीं ब्राह्मण जोशी हातांत पंचांगे घेऊन त्यांचे घरीं जातात व आपल्यापुढे राशीचक्रे मांडून त्यांस मुलीमुलांची नावें विचारून मनांत स्वहित संकल्प धरून मोठ्या डौलाने आंगठ्यांची अग्रें बोटांचे कांड्यावर नाचवून भलता एखादा अनिष्ट ग्रह त्यांचे राशीला जुळवून, त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापनेकरितां व त्यांचे सांगतेकरिता कांही द्रव्य शेतकऱ्यापासून घेतात. नंतर शेतकऱ्यांच्या मुलाचा तिथिनिश्चय करतेवेळी नवरीचे घरी वस्राचे चौघडीवर तांदुळाचे रांगोळ्यांनी चौकौनी चौक तयार करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसवून त्यांचेपुढे खोबरे, खारका व हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात, हळदकुंकू व अक्षदा मागवून मुलीचे व मुलांचे वय, वर्ण, गुण वगैरे यांचा काडिमात्र विचार न करितां कामापुरत्या सुपाऱ्यांत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून समर्पयामीचे धांदलींत शेतकऱ्यापासून सण्यांनी पैसे उपटून कागदाचे चिठोऱ्यावर नेमलेल्या तिथीचे टिप्पण करितात व त्यावर हळदकुंकाचे माखण करून ते उभयतांचे हाती देतात. नंतर तेथील सामानपैशासहित चौकाचे तांदूळ आपले पदरीं आवळून गणपतीसही घरी फोडून खाण्या करिता कडोसरीस लावून निघून जातात.

लग्नाचे पूर्वीं मारुतीचे देवळांत वधूकडील पोषाक नवरेमुलास देतेवेळीं भटब्राह्मण आणा दोन आणे कडोरीस लावून पानविडे पागोट्यातं खोवतात.नंतर वधूचे मांडवात नवरा मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयतांस उभे राहण्याकरिता पायपाट्यामध्यें थोडेथोडे गहूं भरवून त्यावर समोरासमोर उभे करितात.पुढें वधूवरांचे मामाचे हातीं नागव्या तरवारी देऊन त्यास पाठीराखे करितात. व तेथे जमलेल्या मंडळीपैकीं भलत्या कोणचीं तरी अंगवस्त्रे घेऊन त्यावर हळदकुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरांमध्ये अंतरपाट धरून पाळीपाळीनें कोणी कल्याण रागांत व कोणी भैरवी रागांत श्लोक व आर्यांसहित शुभमंगल म्हणून ते अज्ञानी शेतकऱ्यांचे मुलाबाळांची लग्नें लावतात. कित्येक सधन माळया कुणब्यांचे लग्नांत त्यांचे भाऊबंद,सोयरेधायरे,वऱ्हाडी यांची पर्वा न करतां, अगांतुक ब्राह्मण दक्षिणेसाठी मांडीवर शालजोड्या घेऊन मोठ्या झोकानें लोडाशीं टेकून बसून मांडवात इतकी धांदल करितात कीं,वधूवरांच्या बापांनी आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांचे आगतस्वागत करून त्यांस पानविडे देण्याची पुरती फुरसत होऊं देत नाहीत. असले निःसंग दांडगे भिकारी दुसऱ्या एखाद्या देशांत अथवा जातीत सांपडतील काय?

इतक्यांत लग्न लावणारे भटजी वधूवरांस खाली समोरासमोर बसवून त्यांचेपुढे नाना प्रकारचे विधी करितांना, वेळोवेळी ”दक्षिणा समर्पयामि” म्हणतां म्हणतां शेवटी थोडयाशा काडवासुड्या गोळा करून त्यांस अग्नि लावून त्यांत तूप वगैरे पदार्थ टाकून वधू-वरांस लज्जामोहाच्या निमित्तानें चरचरीत धुऱ्या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिधे व दक्षिणा घेऊन घरीं जातात. साड्याचे दिवशीं एकदोन हेकड शेतकऱ्यांस हाती धरून वधुवरांचे पित्यापासून मन मानेल तशा रकमा आडवून घेतात व त्याचप्रमाणें मांडव खंडण्याबद्दल द्रव्य त्याजपासून उपटितात. त्यांतून कित्येक सधन शेतकऱ्यांस कर्ण वगैरे दानशूरांच्या उपमा देऊन त्याचेपुढें नानाप्रकारचे गोंडचाळे करून त्यांस इतके पेटवितात कीं लग्नाचे अखेरीस त्यांचे घरीं मोठमोठ्या सभा करून त्यांत एकंदर वैदिक, शास्त्री, पुराणिक, कथेकरी व भिक्षुक भटब्राह्मणांची वर्गावार्गी न करितां त्यांजपासून दक्षिणा उपटून आपआपले घरीं जातां जातां त्यांजपैकीं कित्येक गुलहौशी भटब्राह्मण रात्रीं मांडवांत नाच असल्याविषयीं तपास ठेवून डोचक्यावर पिटुकल्या पागुटया व मांडीवर चिटुकल्या शालजोडया ठेवून, आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांचे मांडीशी मांडी भिडवून, लोडाशीं टेकून सर्व रात्रभर नाकाच्या जोडनळ्यांत तपकिरीचे वायबार ठासतां ठासतां आसपास तपकिरीचा धूरळा उडवून खुशाल नायकणींची गाणीं ऐकत बसतात.

पान क्र. ३ 

पुढें शेतकरी लोक वयपरत्वें मरण पावताचं त्यांची मुले संसार करूं लागल्यापासून त्यांचे मरणकाळपावेतों त्यांस भटब्राह्मण धर्माचे भुलथापाने कसें व किती नागवितात, त्याबद्दल एथें थोडासा खुलासा करितों.

शेतकऱ्यांची मुलें आपली नवी घरें बांधतेवेळीं शूद्र बिगारी भर उन्हाचे तपांत उरापोटावर मलमा वगैरेची टोपलीं वहातात. गवंडी व सुतार उंच गगनचुंबित पहाडावर माकडाचे परी चढून भिंती रचून, लाकडांच्या कळशा जोडून घरें तयार करितात. यामुळे त्यांची दया येऊन त्या बापुड्या कामगारांस गृहप्रवेश करतेवेळीं तूपपोळयांची जेवणे देऊं, म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व ती जेवणे शेतकरीकामगारांस देण्यापूर्वी भटब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर रात्रंदिवस घिरट्या घालून त्यास नानाप्रकारच्या धर्मसंबधी भुलथापा देऊन, कित्येक ब्राह्मण अंमलदारांच्या आललटप्पू शिफारशी भिडवून, त्यांच्या नव्या घरांत होमविधी करून घरच्या वळचणीला जागोजाग चिंध्यांचीं निशाणे फटकावून, प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलांबाळांसहीत तूपपोळ्यांची यथासांग भोजनें सारून, उरलेसुरले शिळेपाके अन्न भोळ्या भाविक अज्ञानी घरधन्यास त्याच्या मुलाबाळांसहित कामगारास गुळवन्य२ बरोबर खाण्याकरिता ठेवून पानविडे खाता उसातील३ इमानी कोल्हेभुकीदाखल आशिर्वाद देऊन शेतकऱ्यांपासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवित घरोघर जातात व एकदोन मतलबी साधू भटब्राह्मण कित्येक अल्पवयी अल्लड शेतकऱ्यांचे जिवलग गडी बनून त्यांच नांवलौकिकाचे शहास गुंतवून त्यांजकडून लहानमोठ्या सभा करवून त्यांमध्यें कांहीं भटब्राह्मणांस शालजोड्या देववून बाकी सर्वांना दक्षिणा देववितात. शेतकऱ्यांनी नवीन बांधलेले शेतखाने खेरीज करून त्यांनी नवीं देवळे, पार वगैरे इमारती तयार केल्या कीं, तेथे त्यांजपासून उद्यापनाचे निमित्तानें ब्राह्मणभोजन व दक्षिणा घेतातच.

दर चैत्रमासी वर्षप्रतिपदेस भटब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर वर्षफळ वाचून त्यांजपासून दक्षिणा घेतात. तसेंच रामनवमी व हनुमंतजयंती निमित्ताने भटब्राह्मण आपली आळीत एकादा सधन शेतकरी असल्यास त्याजपासून अगर गरीबच सर्व असल्यास त्यांजपासून आळीपाळीने वर्गण्या जमा करून तूपपोळ्यांची ब्राह्मणभोजने घेतात.

जेजुरीचे यात्रेत आपल्या मुलाबाळांसह तळे वगैर ठिकाणी अंघोळी कारितेवेळी भट्ब्राह्मण तेथें संकल्प म्हणून त्या सर्वापासून एकेक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारें पाऊण लांखाच्या खालीं नसतें; व त्यांपैकी कित्येक अल्लड सधन शेतकऱ्यांचे मांडीवर खल्लड मुरळ्या बसताच त्यांजपासून देवब्राह्मण सुवासिनीचे निमित्ताने तूपपोळ्यापुरते द्रव्य उपटतात.शिवाय शेतकऱ्यांचे भंडारखोबरे, खंडोबा देवापुढे उधळण्याकरिता खरेदी कारितेवेळी, भटब्राह्मण वाण्याबरोबर आतून पाती ठेवून त्यास बरेच नाडीतात.

दर आषाढमासीं एकादशीस भटब्राह्मण शिधे देण्याची ऐपत नसणाऱ्यां कंगाल शेतकऱ्यापासूनसुद्धा निदान एक पैसातरी दक्षिणा घेतात.

पंढरपुरी एकंदर सर्व शेतकरी आपल्या स्त्रिया व मुलेंबाळे यांसहित चंद्रभागेत स्नान करितेवेळीं भटब्राह्मण नदीचे किनाऱ्यावर उभें राहून, संकल्प म्हणून त्या सर्वापासून एकेक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारें एक लक्षाचे खाली नसते; व त्यापैकी कांही शेतकऱ्यांपासून दहा सुवासिनीब्राह्मणांस व कांहीं शेतकऱ्यांपासून निदान एक सुवासिनीब्राह्मणास तूपपोळयांचे भोजन देण्यापुरत्या रकमा उपटून माजघरात आपले घरची

मंडळी पात्रावर बसविलेली असते, तेथें प्रत्येक शेतकऱ्यास निरनिराळें नेऊन म्हणतात कीं, “हे पहा तुमच्या सुवासिनीब्राह्मणजेववयास बसत आहेत त्यांस काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहीतर त्यांस दुरून नमस्कार करून बाहेर चला म्हणजे ते देवास (विठोबास )नैवेद्य पाठवून जेवावयास बसतील.” असे प्रामाणिक धंदे करून पंढरपुरातील शेकडो ब्राह्मण बडवे श्रीमान झाले आहेत.

पान क्र. ४ 

दर श्रावणमासी नागपंचमीस बिळात शिरणाच्या मूर्तिमंत नागाच्या टोपल्या बगलेत मारून शेतकऱ्यांचे आळोआळीने, नागकू दुध पिलाव, ”नागदक्षिणा समर्पयामि” म्हणून पैसा गोळा करीत फिरण्याची भटब्राह्मणांची वडिलोपार्जित वृति, वैदू व गारोडयांनी बळकाविली असता त्याजवर ते नुकसानीबद्दल फिर्याद न करिता, केवळ दगडाच्या किंवा चिखलाच्या केलेल्या नागांच्या पुजा करून अज्ञानी शेतकऱ्यापासून दक्षिणा घेतात.

पौर्णिमेस श्रावणीच्या निमित्ताने महाराच्या गळ्यांतील काळ्या दोऱ्यांची खबर न घेता कित्येक डामडौली कुणब्यांचे गळ्यांत पांढया दोऱ्याची गागाभटी१ जानवी घालताना शिधादक्षिणेवर धाड घालितात. एकंदर सर्व शेतकऱ्यांचे हातात राख्याचे२ गंडे बांधून त्यांजपासून एकेक पैसा दक्षिणा घेतात.

वद्यप्रतिपदेस भटब्राह्मण बहुतेक सधन शेतकऱ्यांस सप्ताहाचा नाद लावून त्यांचे गळ्यात विणे घालून त्यांचे इष्टमित्रांचे हातात टाळ देऊन त्या सर्वास मृदंगाच्या नादात पाळीपाळीने रात्रंदिवस पोपटासारखी गाणी गाऊन नाचता नाचता टणटणा उड्या मारावयास लावून आपण त्यांचेसमोर मोठ्या डौलाने लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोडा वेळ पाहून, दररोज फराळाचे निमित्ताने त्याजपासून पैसे उपटून गोकुळअष्टमीचे रात्री हरिविजयातील तिसरा अध्याय वाचून यशोदेचे बाळंतपणाबद्दल चुडेबांगङयांची सबब न सांगता, शेतकऱ्यापासून दक्षिणा उपटतात. प्रातःकाळी पारण्याचे निमित्तानें शेतकऱ्यांचे खर्चाने करविलेली तुपपोळ्यांची जेवणे आपण प्रथम सारून उरलेले शिळेपाके अन्न शेतकऱ्यांसहित टाळकुटे मृदंगे वैगऱ्यांस ठेवून घरी निघून जातात.

शेवटी श्रावण महिऱ्यांतील सरते सोमवारी भटब्राह्मण बहुतेक देवभोळया अज्ञानी३ यथासांग शिधेसामग्या घेऊन, प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलांबाळांसहित जेवून गार झाल्यावर प्रसादादाखल एकदोन पुरणपोळ्या व भाताची मूद भलत्यासलत्या इस्तऱ्यावर घालून, दुरून शेतकऱ्यांचे पदरात टाकून, त्यांच्या समजुती काढितात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


दर भाद्रपदमासीं भटब्राह्मण हरतालिकेचे मिषानें आबालवृद्ध शेतकरणीपासून एकेक, दोनदोन पैसे लुबाडीतात. गणेशचतुर्थीस शेतकऱ्यांचे घरांत गणपतीपुढे टाळ्चा वाजवून आरत्या म्हणण्याबद्दल त्यांजपासून काही दक्षिणा घेतात. ऋष?पंचमीस रांडमुंड शेतकरणी स्रीयांस पाण्याचे डबकांत बुचकळया मारावयास लावून भटब्राह्मण, शेतकऱ्यांचे जिवावर गणपतीचे संबंधानें दिवसा मोदाकांसह तूपपोळ्यांची भोजने सारून वरकांति कीर्तने श्रवण करण्याचे भाव दाखवून अहोरात्र नामांकित कसबी?च्या सुरतीकडे मंगळ ध्यान लावून त्यांची सुस्वर गाणी ऐकण्यात चूर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांतील कुंभारी गौरीच्या मुखाकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहींत.

पान क्र. ५ 

चतुर्दशीस अनंताचे निमित्तानें शेतकऱ्यांपासून शिधेदक्षिणा घेतात. पितृपक्षांत भटब्राह्मण एकंदर सर्व शेतकरी लोकांत पेंढारगर्दी उडवून त्यांच्यामागे इतके हात धवून लागतात किं, त्यांच्यातील मोलमजुरी करणाऱ्या दीनदुबळ्या निराश्रित रांडमुंड शेतकरणींपासूनही त्यांच्या गणपतीच्या नांवानें त्यांजपासून निदान सिधे, दक्षिणा व भोपळ्याच्या फांका घेवून आपल्या पायांवर डोचकी ठेवल्याशिवाय त्यांच्या सुटका करीत नाहीत. मग तेथे भोंसले, गायकवाड, शिंदे आणि होळकर यांची काय कथा ?

तशांत कपिलषष्ठीचा योग आला कीं, भटब्राह्मण कित्येक सधन शेतकऱ्यांस वाई, नाशिक वगैर तीर्थांचेठिकाणी नेऊन त्यांजपासून दानधर्माच्या मिषाने बरेंच द्रव्य हरण करितात व बाकी उरलेल्या एकंदर सर्व दीनदुबळया शेतकऱ्यांपासून स्नान करतेवेळीं निदान एकएक पैसा तरी दक्षिणा घेतात.

शेवटी अमावस्येस भटब्राह्मण शीधेदक्षिणा?च्या लालचीने शेतकऱ्यांच्या बैलांच्या पायाच्या पुजा करवितात. विजयादशमीस घोडे व आपट्यांची झाडें पूजनाचे संबंधानें शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेउन कोजागिरीस त्यांचा हात शेतकऱ्याचे दुधावर सपाटा मारितात.

अमावास्येस लक्ष्मीपूजन व हया पूजनाचे संबंधानें शेतकऱ्यापासून लाहया बत्ताशांसह दक्षिणा घेतात. दर कार्तिकमासी बलीप्रतिपदेस भटब्राह्मण मांगामहाराप्रमाणे हातांत पंचार्त्या घेउन शेतकऱ्यास ओवाळतां ओवळतां “इडापिडा जावी आणि बळींचे राज्य येवो' हा मूळचा खरा अशिर्वाद देऊन शेतकऱ्यांच्या ओवाळण्या न मागतां, हातावर शालजोडया घेऊन त्यांस यजमानाची नाती लावून शेतकऱ्यांचे घरोघर माली मागत फिरतात.

आळंदीचे यात्रेत शेतकरी आपल्या कुटुंबासह इंद्रायणी?त स्नाने करीत असता भटब्राह्मण त्या सर्वांपुढे संकल्प म्हणून त्यांजपासून एकेक पैसा दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारें पाऊण लक्षाचे खाली नसते. नंतर द्वादशीस देवब्राह्मणसुवासिनीचे निमित्ताने कित्येक देवभोळ्या शेतकऱ्यांपासून तूपपोळयांची व त्यांतून कोणी फारच दरिद्री असल्यास त्याजपासून साधा सिधा घेऊन आपापले कुटुंबासह भोजने करून त्या सर्व अज्ञानी भाविकांस तोंडी पोकळ आशीर्वाद मात्र देतात.

शिवाय भोंवर गावातील शेतकऱ्यास पंधरवाड्याचे वारीचे नाडी लावून त्या सर्वांपासून बारा महिने दर द्वादशीस पाळीपाळीनें तूपपोळयांचीं ब्राह्मणभोजनें काढितात.इतकेंच नव्हे परंतु कित्येक परजिल्ह्यातील सधन शेतकऱ्यांस चढी पेटवून त्यांपासून तूपपोळ्यांची सहस्रभोजने घालवितात. शेवटी पारगांवचे शेतकऱ्यांचे पंचानी अदावतींने गुन्हेगार ठरवून पाठविलेल्या शेतकऱ्यांचे क्षौर करवून त्यांस प्रायश्चित्त्ताचे निमित्ताने थोडे का नागवितात ?

वद्य द्वादशीस भटब्राह्मण शेतकऱ्यांचे आंगणांतील तुळशीवृंदावनासमोर धोत्राचा अंतरपाट धरून मंगलाष्टकाचे ऐवजी दोन चार श्लोक व आर्या म्हणून तुळशीचीं लग्ने लावून शेतकऱ्यापासून आरतीचे पैशासहओटीपैकी काही समान हाती लागल्यास गोळा करून जातात.

दर पौषमासीं मकरसंक्रांत शेतकऱ्यांचे घरीं संक्रांतफळ वाचून त्यांजपासून दक्षिणा घेतात व कित्येक अक्षरशून्य देवभोळया शेतकऱ्यांस अगाध पुण्यप्राप्तीची लालूच दाखवून त्यांजकडून मोठ्या उल्हासाने त्यांची उसांची स्थळे भटब्राह्मणाकडून लुटवितात.

दर माघमासी महाशिवरात्रीस भटब्राह्मण कित्येक शेतकऱ्यांचे आळी?तील देवळांनी शिवलीलामृताच्या अवृत्त्या करून सूर्योदयाचे पूर्वी समाप्ति करतेवेळी त्यांजपासून ग्रंथ वाचण्याबद्दल शिधेदक्षिणा उपटून नेतात.

दर फाल्गुनमासी होळीपूजा करितांच; शेतकऱ्याजवळचे द्रव्य उडालें यास्तव म्हणा, अगर हिंदुधर्माचे नावाने ठणाणा बोंबा मारितात, तरी हे भटजीबुवा त्यांजपासून ग्रंथ काही दक्षिणा घेताल्या विना त्यांस आपापल्या डोचक्यात धूळमाती घालण्याकरिता मोकळीक देत नाहीत.

पान क्र. ६ 

सदरी लिहिलेल्या प्रतिवर्षी येणा-या सणांशिवाय मधूनमधून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण व ग्रहांचे उलटापालटीचे संबधाने शेतकऱ्यापासून भटब्राह्मण नाना प्रकारची दाने घेऊन एकंदर सर्व पर्वण्या पाळीपाळीने बगलेत मारून, व्यतिपात भाऊबळाने शेतकऱ्यांचे आळोआळीने भीक मागत फिरतात. शिवाय शेतकऱ्यांचे मनावर हिंदुधर्माचे मजबूत वजन असून त्यांनी निःसंग होऊन आपले नादी लागावें म्हणून, सधन शेतकऱ्यांचे घरोघर रात्रीं भटब्राह्मण कधी कधी पांडवप्रताप वगैरभाकड पुराणांची पारायणे करून त्यांजपासून पागोट्याधोत्रासह द्रव्यावर घाला घालून, कित्येक निमकहरामी भटब्राह्मण आपल्या शेतकरी यजमानाच्या सुनाबाळांस नादी लावून त्यांस कुकूचकू करावयास शिकवतात. त्यांतून अधीमधीं संधान साधल्यास शेतकऱ्यांचे घरी भटब्राह्मण सत्यनारायणाच्या पूजा करवून प्रथम शेतकऱ्यांचे केळांत सव्वा शेरांचे मानानें निर्मण रवा, निरसें दूध, लोणकढे तूप, व धुवासाखर घालून तयार करविलेले प्रसाद घशांत सोडून नंतर आपल्या मुलांबाळांसहित तूपपोळ्यांची भोजनें सारून, त्यांजपासून यथासांग दक्षिणा बुचाडून, उलटें शेतकऱ्यांचे हाती कंदिल देऊन घरोघर जातात.

इतक्यांतून शेतकऱ्यांपैकी काही दुबळे स्त्री-पुरुष चुकून राहिल्यास भटपुराणिक त्या सर्वांस भलत्या एकाद्या देवळात दररोज रात्री जमा करून त्यांस राधाकृष्णाची लीला वगैरेंसंबंधी पुराणे श्रवण करण्याचे नादी लावतात . समाप्तीचे समयी त्या सर्वांस चढाओढीत पेटवून त्यांजपासून तबकात भल्या मोठया महादक्षिणाजमा केल्यानंतर, शेवटी त्यांच्या निराळ्या वर्गणीच्या खर्चाने आपण मोठ्या थाटाने पालख्यांत बसून एकंदर सर्व श्रोतेमंडळीस मागेपुढे घेऊन मिरवत मिरवत बरोबर जातात.

कित्येक अक्षरशत्रु भटब्राह्मणांस पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बेवकूब ठोंब्यास ढवळयाबुवा बनवून त्याचे पायांत खडावा व गळयांत विणा घालून त्याजवर एकाद्या शूद्राकडून भली मोठी छत्री धरवून बाकी सर्व त्याचेमागें झांज्या, ढोलके ठोकीत “जे जे राम, जे जे राम,” नामाचा घोष करीत अज्ञानी शेतकऱ्यांचे आळोआळीने प्रतिष्ठित भीक मागत फिरतात.

कित्येक भटब्राह्मण मोठमोठ्या देवळांतील विस्तीर्ण सभामंडपांत आपल्यापैकी एखाद्या देखण्या जवनास कवळेबुवा बनवून त्याचे हातांत चिपळ्याविणा देऊन बाकी सर्व त्याचेमागे ओळीनें तालमृदुंगाचे तालांत मोठ्या प्रेमानें “राधा कृष्ण राधा” म्हणतां म्हणतां नाच्यापोरासारखे हावभाव करून दर्शनास येणा-या जाणाच्या सधन रांडमुंडीस आपले नादी लावून आपली पोते भरून मोठ्या मौजा मारितात.

कित्येक मतिमंद भटब्राह्मणांस भटपणाचा धंदा करून चैना मारण्यापुरती अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या भोळसर कारकुनास देवमहालकरी बनवून बाकीचे ब्राह्मण गांवोगांव जाऊन अज्ञानी शेतकऱ्यांपासून देवमहालकऱ्यास नवस करवून त्यास त्यासंबधाने बरेंच खोरीस आणितात.

कित्येक भटब्राह्मणास वेदशास्त्रांचे अध्यन करून प्रतिष्ठेने निर्वाह करण्याची ताकद नसल्यामुळे ते आपल्यापैकी एकाद्या अर्धवेड्या भांग्यास बागलकोटचे स्वामी बनवून बाकीचे भटब्राह्मणगांवोगांवजाऊन “ स्वामी मनांतील वासना मनकवड्यासारख्या जाणून त्यांपैकी कांहीं पूर्ण होण्याविषयीं अन्यमार्गानें बोलून दाखवितात.” अशा नानाप्रकारच्या लोणकढ़या थापा अज्ञानी शेतकऱ्यांस देऊन त्यांस स्वामीचे दर्शनास नेऊन तेथे त्यांचे द्रव्य हरण करितात.

सदरी लिहिलेल्या एकंदर सर्व भटब्राह्मणांच्या धर्मरूपी चरकांतून शेतकऱ्याची मस्ती जिरली नाही, तर भटब्राह्मण बदरीकेदार वगैर तीर्थयात्रेचे नाडी लावून शेवटी त्यांस काशीप्रयागास नेऊन तेथे त्यास हजारों रुपयास नागवून त्यांच्या दाढयामिशा बोडून त्यांस त्यांचे घरी आणून पोहोचवितात. व शेवटी त्याजपासून मांवद्याचे निमित्ताने मोठमोठाली ब्राह्मणभोजने घेतात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ७ 

अखेर शेतकऱ्यांचे मरणानंतर भटब्राह्मण स्मशानी कारट्यांची सोंगे घेऊन त्यांचे पुत्राकडून दररोज नाना प्रकारचे विधि करवून त्याचे घरी दररोज गरुडपुराणाचे वाचन, दहावे दिवशी धनकवडी वगैरे डिपोवरील वतनदार कागभटजीस कॉव कॉव म्हणून पिंडप्रयोजनाचा मानपान देऊन त्याजपासून गरुडपुराणे मजुरीसहितनिदान तांबे, पितळया, छत्र्या, काठ्या, गाद्या व जोडे दान घेतात. पुढे शेतकऱ्यांची एकंदर सर्व मुले मरेपावेतो त्याजपासून मयताचे श्राद्धपक्षास पिंडदाने करवितेवेळी त्याचे ऐपतीचे, मानाने शिधे व दक्षिणांची वर्षासने घेण्याची वहिवाट त्यांनी ठेविली आहे.

ती ही कीं, शेतकरी यजमानास मोठी लाडीगोडी लावून कोणास कारभारी, कोणास पाटील, कोणास देशमुख वगैरे तोंडापुरत्या पोकळ पदव्या देऊन, त्यांजपासून भटब्राह्मण आपले मुला-मुलींचे लग्न वगैरे समयी केळीच्या पानासह भाजीपाले फुकट उपटून त्यांजवर आपली छाप ठेवण्याकरिता शेवटी एखादे प्रयोजानांत त्या सर्वांस आमंत्रणे करून मांडवात आणून बसवितात व प्रथम आपण आपले जातवाल्या स्त्रीपुरुषांसह भोजनें सारून उठल्यानंतर तेथील सर्व एकंदर पात्रांवरील खरकट्याची नीटनेटकी प्रतवार निवड करून त्यांस आपले शूद्र चाकरांचे पंक्तीत बसवून ति सर्व खरकटी मोठ्या काव्या-डाव्याने नानातर्हेचे सोंवळेचाव करून दुरूनच वाढितात; परंतु बाजारबसव्या काड्यामहालांतील शेतकऱ्यांच्या हंगामी वेसवारांडांच्या मुखास चुंबनतुंबड्या लावून त्यांच्या मुखरसाचे धुडके१ घेण्याचा काडीमात्र विधिनिषेध न करतां, ते आपले यजमान शेतकऱ्यांस इतके नीच मानितात कीं, ते आपल्या अंगणांतील हौदास व आडास शेतकऱ्यांला स्पर्शसुद्धां करूं देत नाहीत; मग त्यांच्याशीं रोटी व बेटीव्यवहार कोण करितो?

एकंदर सर्व सदरचे हकिगतीवरून कोणी अशी शंका घेतील कीं, शेतकरी लोक आज दिवसपावेतों इतके अज्ञानी राहून भटब्राह्मणांकडून कसे लुटले जातात? यास माझें उत्तर असें आहे कीं, पूर्वी मूळच्या आर्य भटब्राह्मणांचा या देशांत अम्मल चालू होतांच त्यांनी आपल्या हस्तगत झालेल्या शुद्र शेतकऱ्यास विद्या देण्याची आटोकाट बंदी करून त्यास हजारो वर्षे मन मानेल तसा त्रास देऊन लुटून खाल्ले, याविषयी त्यांच्या मनुसंहितेसारखे मतलबी ग्रंथांत लेख सांपडतात. पुढे कांहीं काळानें चार नि:पक्षपाती पवित्र विद्वानांस ब्रह्मकपटाविषयी बरे न वाटून त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना करून, आर्य ब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माचा बोजवार करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांस आर्यभटांचे पाशांतून मुक्त करण्याचा झपाटा चालविला होता. इतक्यांत आर्य मुगुटमण्यांतील महाधूर्त शंकराचार्यांनी बौद्धधर्मी सज्जनांबरोबर नाना प्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानात मोड करण्याविषयी दीर्घ प्रयत्न केला. तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तीलप्राय धोका न बसतां उलटी त्या धमचिी दिवसेंदिवस जास्त बढती होत चालली. तेव्हां अखेरीस शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यात सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोराने तेथील बौद्ध लोकांचा मोड केला. पुढे आर्य भटजीस गोमांस व मद्य पिण्याची बंदी करून, अज्ञानी शेतकरी लोकांचे मनावर वेदमंत्र जादुसाहित भटब्राह्मणांचा दरारा बसविला.

त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत महमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्य भटांचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथसारख्या मूर्तींचा तरवारीचे प्रहारांनी विध्वंस करून, शुद्र शेतकऱ्यांस आर्यांचे ब्रह्मकपटातून मुक्त करू लागल्यामुळे, भटब्राह्मणांतील मुकुंदराजव ज्ञानोबांनी भागवतबखरींतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेंत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नांवाचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मनें इतकी भ्रमिष्ट केली कीं, ते कुराणासहित महमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करूं लागले.

पान क्र. ८ 

नंतर थोडा काळ तुकाराम नावाचा साधु शेतकऱ्यांत निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशांतून सोडवील, या भयास्तव भटब्राह्मणांतील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगन्मत्तानें अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही.

पुढे शिवाजी राजाचे पाठीमागें त्याच्या मुख्य भटपेशव्या सेवकानें शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटकेंत ठेविलें. पेशव्याचे अखेरीचे कारकीर्दीत त्यांनी गाजररताळांची वरू व चटणीभाकरीवर गुजारा करणाऱ्या रकटयालंगोट्या शेतकऱ्यापासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यांतून त्यांच्या शेतीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरणे वगैरे बांधकामाकडे एक छदाम खर्च न घालतां, पर्वतीचे रमण्यांत वीसवीस पंचवीसपंचवीस हजार भटब्राह्मणांस मात्र शालजोड्या वगैरे बक्षिसे देण्याचा भडीमार उठविला व हमेशा पेंढाऱ्यांनी लुटून फस्त केलेल्या शेतकऱ्यांपासून सक्तीनें वसूल केलेल्या जमादारखान्यातून अज्ञानी शेतकऱ्यांस निदान प्राकृत विद्या देण्याकरिताही दमडीच्या कवड्या खर्ची न घालतां, ब्राह्मणां ची मतलबी धर्मशास्त्रे शिकणाऱ्या भटब्राह्मणांस शेकडों रुपयांनी वर्षासने देण्याची चंगळ उडवून, पर्वतीचे रमण्यांतील कोंडवाडयांत मात्र एकंदर ओगराळयांनी मोहरापुतळयांची खिचडी वाटण्याची बाजीराव पेशवेसाहेबांनी मोठी धूम उडविली, म्हणून आम्हांस फारसें नवल वाटत नाही.

कारण रावबाजी हे अस्सल आर्य जातीचे ब्राह्मण होते. सबब तसल्या पक्षपाती दानशूरानें पर्वतीसारख्या एखाद्या संस्थानांत शेतकऱ्यांपैकी कांहीं अनाथ रांडमुंडींची व निराश्रित पोरक्या मुलीमुलांची सोय केली नाहीं, फक्त आपल्या१ जातीतील भटब्राह्मण, गवई पुजारी व चारपांच हिमायती अगांतुक भटब्राह्मणांस दररोज प्रात:काळीं अंघोळीस ऊन पाणी व दोन वेळां प्रतिदिवशीं पहिल्या प्रतीचीं भोजनें मिळण्याची सोय करून, हरएक निरशनास दूध पेढे वगैरे फराळाची आणि पारण्यास व एकंदर सर्व सणावारांस त्यांचे इच्छेप्रमाणे पक्वान्नांची रेलचेल उडवून त्या सर्वांस अष्ट?प्रहर चौघड्यासहित गवयांची गाणीबजावणी ऐकत बसवून मौजा मारण्याची यथास्थित व्यवस्था लावून ठेवली आहे.

या वहिवाटी आमचे भेकड इंग्रज सरकार जशाच्या तशाच आज दिवसपावेतों ठेवून त्याप्रीत्यर्थ कष्टाळू शूद्रादि अतिशूद्र शेतकऱ्यांचे निढळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यांतून हजारों रुपये सालदरसाल खर्ची खालते?

सांप्रत कित्येक शूद्रादि अतिशूद्र शेतकरी खिस्ति धर्म स्वीकारून मनुष्यपदास पावल्यानें, भटब्राह्मणांचे महत्व कमी होऊन त्यांना स्वतः मोलमजुरीचे कामें करून पोटे भरण्याचे प्रसंग गुदरत चालले आहेत, हे पाहून कित्येक धूर्त भटब्राह्मण खुळ्या हिंदुधर्मास पाठीशी घालून नानाप्रकारचे नवे समाज उपस्थित करून त्यांमध्यें अपरोक्ष रीतीनें महमंदी व ख्रिस्त धर्माच्या नालास्त्या करून त्यांविषयी शेतकऱ्यांची मनें भ्रष्ट करीत आहेत. असो; परंतु पुरातन मूर्तिपूजोत्तेजक ब्रह्मवृंदांतील काका व सार्वजनिक सभेचे पुढारी जोशीबुवा यांनी हिंदुधर्मातील जातीभेदाच्या दुरभिमानाचे पटल आपल्या डोळ्यांवरून एकीकडे काढून शेतकरी लोकांची स्थिती पाहिली असती तर, त्यांच्यार्ने एकपक्षीय धर्माच्या प्रतिबंधानें नाडलेल्या बिचाऱ्या दुर्दैवी शेतकऱ्यांस अज्ञानी म्हणण्यास धजवले नसतें; व जर ते आमच्या इंग्रज सरकारास शेतकऱ्यांवर होणाऱ्या धर्माच्या जुलमाची यथातथ्य माहिती करून देते, तर कदाचित, त्यास दयेचा पाझर फुटून तें भूदेव भटब्राह्मण कामगारांची शूद्रास विद्या देण्याच्या कामात मसलत न घेता,त्यांस ती देण्याकरिता निराळे उपाय योजीते.

पान क्र. ९ 

सारांश, पिढीजात अज्ञानी शेतकऱ्यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्मणांकडून इतकी हानि होते किं, त्यांजला आपली लहान मुलेसुद्धा शाळेंत पाठवण्याचे त्राण उरत नाही व याशिवाय आर्यभटऋषींनी फार पुरातन काळापासून “शूद्र शेतकऱ्यास ज्ञान देऊं नये” म्हणून सुरूं केलेल्या वहिवाटीची अज्ञानी शेतकऱ्यांचे मनावर जशीची तशीच धास्ती असल्यामुळे त्यांना आपली मुलें शाळेत पाठविण्याचा हिय्या होत नाही आणि हल्लीचे आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांनी अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यांतील महाप्रतापी जॉर्ज वाशिंगटन ताताचा कित्ता घेऊन, येथील ब्राह्मण सांगतील ती धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे मानणाया अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस, विद्वान भटब्राह्मणांप्रमाणेच म्युनिसिपालिटीत आपले वतीने मुखत्यार निवडून देण्याचा अधिकार दिला आहे खरा; परंतु या प्रकरणांत भटब्राह्मण आपले विद्याचे मदांत सोवळ्या ओवळयाच्या तोयांनी अज्ञानी शूद्रादि अतिशूद्र लोकांशीं छक्केपंजे करून त्यांना पुढे ठकवू लागल्यास आमचे दयाळू गव्हर्नर जनरलसाहेबांचे माथ्यावर कदाचित् अपयशाचे खापर न फुटो, म्हणजे भटब्राह्मणांचे गंगेंत घोडे नाहले, असे आम्ही समजू.
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.