Sunday, 6 August 2017

उपोद्घात

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले

उपोद्घात

महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली,
नीतिविना गति गेली ! गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.

उद्देश, शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूनें हा पुढील ग्रंथ रचिला आहे. शूद्रशेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐषआरामी असल्याचे योगानें, ब्राह्मण त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगानें आपला बचाव करिता यावा असा हेतू आहे, म्हणून हया ग्रंथास ‘शेतकऱ्याचा असूड’ असे नाव दिले आहे.

वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करूं लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करुं लागले, ते माळी व जे हीं दोन्हीही करून मेंढरें, बकरी वगैरेचे कळप बाळगूं लागले, ते धनगर असे निरनिराळया कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आतां या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्त बेटी१ - व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व कांही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत. आतां पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायानें सोडून उदार्निर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे करू लागले.

ज्यांजवळ थोडेबहुत अवसान आहे ते आपली शेती सांभाळून राहतात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडे नागडे व भुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाहीं, ते देश सोडून जिकडे जिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटें व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटीं पेनशनें घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीनें पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुलें, ज्यांस विद्येची गोडीच नाही अशीं, त्यांची थोडयाच काळांत बाबूके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नांवानें पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनी शिपायगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, इनामें वगैरे कमाविली व कित्येक तर शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेच बनून गेले होते. परंतु हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासही मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागिरदांस आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले, कसकशीं संकटे भोगिली यांची कल्पना मनांत न येतां, ते ऐत्या पिठावर रेघा ओढून अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लुच्चे लोकांचे संगतीने रात्रंदिवस ऐषआरामांत व व्यसनांत गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत, अथवा ज्यांस कर्जाने व्याप्त केले नाही असे विरळाच. आता जे संस्थानिक आहेत त्यांस जरी कर्जवाम नाहीं, तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राह्मण कारभारी इतके मतलबी, धूर्त, धोरणी असतात की, ते आमच्या राजेरजवाड्यांस विद्येची व सद्गुणांची अभिरुचि लागूं देत नाहीत.

यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचे स्वरूप न ओळखून, आपल्या पूर्वजांनी केवळ आमचया चैनीकरिताच राज्य संपादन केले असे मानून, धर्माचे योगाने अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र पाहण्याचे आंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भार टाकून ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंझळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. अशा राजेरजवाड्यांच्या हातून आपल्या शूद्र जातबांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष, परंतु त्यांच्या मनात जो विचार कधीही आला नाही व जोपर्यंत ‘ब्राह्मणो मम दैवतं ’ हे डोक्यांतून निघाले नाही, तोपर्यंत कितीही कपाळकूट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेही करून तसें करण्यास कोणी प्रवृत्त झाल्यास बाळपणापासून मनावर जाहलेल्या दृढ संस्कारामुळे या मतलबी धर्माचे विरुद्ध चार गोष्टी ऐकून त्यांचा विचार करणे त्यांस कोठून रुचणार? व जवळचे कारभारी अगोदर अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमान्याची डाळच शिजूं देणार नाहीत, तशांतून धैर्य धरून एकाद्यानें मला तशी सवड दिल्यास मोठ्या आनंदानें मी यथामति आपले विचार त्यांचेपुढे सादर करीन.


असों, जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पहातां, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळया शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशूपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगणयास नको, असे सहाय्य घडल्यावांचून याची रचना करतां आली नसती हे उघडच आहे.

या ग्रंथात जे कांही मी माझ्या अल्प समजुतीने शोध लिहिले आहेत, त्यांत आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानांत जीं जीं व्यंगे दिसून येतील, त्यांविषयीं मला क्षमा करून, गुणलेशांचा स्वीकार करावा, अशी त्यांस माझी विनंती आहे. आणि जरकरिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यांस कांही (ग्रंथाधार वगैरे) सुचविणे असेल, तर त्याविषयी त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हास कळवावे. म्हणजे कृतज्ञतापूर्वक आभार मानून, दुसऱ्या आवृत्तीचे वेळीं त्यांचा योग्य विचार करूं.

श्रीमंत सरकार गायकवाड सेनाखासखेल समशर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो त्या वेळीं आपल्या सर्व राजकीय कामांतील अमोल्य वेळांत काटकसर करून अप्रतिम उल्हासाने व सप्रेम भावानें मजकडून हा ग्रंथ वाचवून साग्न लक्षपूर्वक ऐकिला व श्रीमन्महाराजांनी आपल्या औदार्याप्रमाणें मला द्रव्यद्वारे मदत करून माझा यथासांग अत्युत्तम आदरसत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा फार फार ऋणी आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हाडपसर, वंगणी, माळयाचे कुरुल वगैरे येथील शूद्र गृहस्थांनी कित्येक वेळां हा ग्रंथ माझ्या तोंडून ऐकला व या ग्रंथांत लिहिलेला मजकूर खरा आहे अशाविषयीं त्यांनी आपल्या सह्या मजकडे पाठविल्या आहेत.
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.